पो. डा. वार्ताहर , परभणी : जिल्ह्यात प्राचीन वारसा लाभलेल्या ऐतिहासिक कला स्थापत्य, भव्य मंदीरे, नानाविध शिल्पकलाकृती, मनमोहक पुष्करिणी आणि शिलालेख मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परभणी जिल्ह्यातील हा ऐतिहासिक ठेवा म्हणजे अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी एक समृद्ध भांडार असुन, याचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या.
जिल्ह्याची ही नवी ओळख सर्व जगास होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे निर्मिती करण्यात आलेल्या ‘परभणी जिल्हा : प्राचीन ऐतिहासिक वारसा’ या ग्रंथाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी सेवा निवृत्त विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, जिपचे शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, परभणी जिल्हा प्रशासनामार्फत एका अभ्यासगटाच्या माध्यमातून या वास्तुंचे सर्वेक्षण आणि संशोधन करण्यात आले आहे. अभ्यासगटाने जिल्ह्यातील 55 गावात केलेल्या सर्वेक्षणात 130 प्राचीन मंदिर स्थापत्य, 492 प्राचीन शिल्पकला, 50 सतीशिळा आणि वीरगळ, 17 शिलालेख आणि 53 प्राचीन बारवा एवढा ऐतिहासिक वारसा संशोधित करण्यात केला आहेत. पर्यटन आणि सांस्कृतिक दृष्ट्या परभणी जिल्ह्याची ही नवी ओळख सर्व जगास व्हावी या उद्देशाने परभणी जिल्हा प्रशासनाद्वारे ‘परभणी जिल्हा : प्राचिन ऐतिहासिक वारसा’ आणि ‘वारसा शिल्पसंपदेचा’ या पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यात आले आहे. या ग्रंथातील माहितीचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी परभणी यांचेकडे आहेत. परंतु सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हा प्राचीन ठेवा पोहचण्याच्या दृष्टीने या पुस्तकातील अंशत: तसेच संपूर्ण माहिती पुस्तकाच्या नावासहित आणि परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा अभ्यासगटाच्या उल्लेखासहित प्रसिद्धी आणि प्रसारासाठी वापरण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही हरकत राहणार नसल्याचे श्रीमती गोयल यांनी सांगितले.
या ग्रंथात धारासूर येथील संपूर्ण शिखरासहीत अस्तित्वात असलेले 11 व्या शतकातील गुप्तेश्वर मंदीर, शिल्पसंपदेचा अमुल्य ठेवा असणारे नेमेगिरी येथील जैन लेणी समुह, अंदाजे सहाव्या शतकातील निरवाडी येथील दुर्मिळ स्थापत्य असलेले महादेव मंदीर आणि अल्पावधीत जगप्रसिद्ध होत असलेली वालुर येथील हेलेकेल स्टेप बारव ही पर्यटनाच्या दृष्टीने मोठ्या संधी निर्माण करू शकते. जिल्ह्यातील चारठाणा येथे गेल्या पाच वर्षात अनेक परदेशी पर्यटकांनी भेट दिलेली आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वदेश दर्शन’ प्रकल्पांतर्गत असलेल्या ‘रामायण सर्कीट’ या योजनेत परभणीतील रामायणकालीन संदर्भ असलेल्या मुदगल, रत्नेश्वर रामपुरी आणि वाघी रामदरा या स्थळांची माहिती देण्यात आल्याचे ही श्रीमती गोयल यांनी यावेळी सांगितले.
सेवा निवृत्त विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यावेळी म्हणाले की, भारतात अनेक ऐतिहासिक प्राचीन वास्तूंची धरोहर आहेत. यामध्ये किल्ले, लेणी, मंदीरे, कमानी, राजवाडे, महाल, विजयस्तंभ, प्रशासकीय इमारतीं आदीं ऐतिहासिक वास्तूंचा समावेश येतो. परंतू यांच्या संवर्धनाबाबत अज्ञान आणि उदासिनता दिसून येते. आपल्या पुर्वजांनी जी धरोहर उभी केली होती ती आज आपण संपवत आहोत. परंतू पुढच्या पिढीला या धरोहरचे महत्व आणि इतिहासाची जाणीव व्हावी यासाठी याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. या धरोहरचे लिखित स्वरुपाच्या इतिहासाबरोबर या राष्ट्रवैभाचे संवंर्धन होणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अभ्यासगटाच्या मार्फत परभणी जिल्ह्यातील प्राचिन ऐतिहासिक वारसा या ग्रंथाची निर्मिती केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकात सुनिल पोटेकर म्हणाले की, ‘परभणी जिल्हा : प्राचिन ऐतिहासिक वारसा’ आणि ‘वारसा शिल्पसंपदेचा’ या ग्रंथाची निर्मित करण्यासाठी अभ्यासगटाने कोणतेही मानधन न घेता मागील पाच वर्ष काम केले आहे. यातील प्रत्येक माहिती आणि छायाचित्र संशोधन करुन संकलित केले आहे. जिल्ह्यातील ही माहिती ग्रंथ स्वरुपात करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच हा ग्रंथ आज आपणांस उपलब्ध झाला असल्याचे सांगितले.
डॉ. आत्माराम शिंदे यांनी भारतातील प्राचीन ऐतिहासिक मंदिरांच्या निर्मितीची यावेळी सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी या ग्रंथ निर्मीतीसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासगटातील सदस्य प्रा. डॉ. नितीन वाबळे, प्रा. डॉ. सीमा नानवटे, डॉ. अविनाश खोकले, अनिल स्वामी, लक्ष्मीकांत सोनवटकर, मल्हारीकांत देशमुख, श्रीकांत उमरीकर, अनिल बडगुजर, निळकंट काळदाते, वैजनाथ काळदाते, नागेश जोशी, प्रल्हाद पवार आणि सुनिल पोटेकर यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना ‘परभणी जिल्हा : प्राचिन ऐतिहासिक वारसा’ आणि ‘वारसा शिल्पसंपदेचा’ हे ग्रंथ जिल्हा प्रशासनामार्फत भेट स्वरुपात देण्यात आले.
जिपचे शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाला यावेळी अभ्यासगट सदस्य, विविध विभागाचे विभाग प्रमुख, जिल्हा परिषद प्राथमिक व केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, देवस्थान ट्रस्टचे सदस्य, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रंथालय प्रमुखांची उपस्थिती होती.