जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनात विविध विभागाची बैठक
पो. डा. वार्ताहर : नागपूर जिल्ह्यामध्ये विविध विभागांमार्फत दहा लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य घेण्यात आले आहे. पुढील 15 सप्टेंबरपर्यंत हे लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज या संदर्भातील आढावा घेण्यात आला.
छत्रपती सभागृहामध्ये झालेल्या आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्यासह वन,शिक्षण, आरोग्य, पोलीस, जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन, महानगरपालिका आदी संस्थांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचा काळ म्हणून वृक्षारोपण दरवर्षी करण्यात येते. विविध विभागाने या काळात वृक्षारोपण सुरू केले आहे. तथापि, ८ जुलैला झालेल्या जिल्हा नियोजन विकास परिषदेच्या बैठकीत आमदार चंद्रशेखर बावनकुळे व अन्य लोकप्रतिनिधींनी यावर्षी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्याबाबत निर्देशित केले होते. वृक्ष लागवड करण्यात यावी व त्याचे संगोपन करण्यात यावे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आजची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्यात कमीत कमी दहा लक्ष रुपये वृक्ष लागवड करण्यात यावी, असे नियोजन करण्यात आले. ग्रामपंचायत, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच सर्व विभागांनी मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
वृक्ष लागवडीकरिता उपवनसंरक्षक, प्रादेशिक वनविभाग, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागातील रोपवाटिकेतून रोपांची उपलब्धता करून देणार आहे. तरी वन महोत्सवाच्या कालावधीत प्रत्येक नागरिकांनी एका वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक कुटुंबाने एक वृक्ष लावावा
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाने एक वृक्ष लावावा व त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना वृक्ष लागवड उपयुक्त ठरणार आहे. नागपूर शहर व जिल्हा आपल्या हिरवेपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, त्याचे संगोपन करावे,हे अभियान जिल्ह्यात या पावसाळ्यात राबवावे असे आवाहन त्यांनी केले.