पो. डा. वार्ताहर , बुलडाणा : शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाईन त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 भरणे आवश्यक आहे. यासाठी संबंधितांनी कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी विकसित केलेल्या mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा कार्यालयाकडे नोंदणीकृत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांनी सेवायोजन कार्यालयात रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959नुसार जून 2023चे त्रैमासिक विवरण पत्र (ईआर-1) दि. 30 जुलै 2023 पर्यंत mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे.
ऑनलाईन त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 भरण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा प्रशासकीय इमारत, बस स्टँड समोर, बुलडाणा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.