पो. डा. वार्ताहर , बुलडाणा : जिल्ह्यातील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी जिल्ह्यात नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 15 वर्षावरील वयोगटातील निरक्षरांना साक्षरता आणि संख्याज्ञान देण्यात येणार आहे. निरक्षरांना शिकविण्यासाठी शाळास्तरावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात तीन लाख 95 हजार निरक्षरांची नोंद करण्यात आली आहे. या निरक्षरांना 15 ते 35 आणि 35 वर्षापेक्षा अधिक अशा दोन वयोगटात 2030 पर्यंत शिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी 2027 पर्यंत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यात शाळा हे केंद्रबिंदू मानून या परिसरात असलेल्यांची सुशिक्षितांची स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून निवडक स्वयंसेवकांना प्रशिक्षण आणि प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने महिला, अनूसुचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक, दिव्यांग व्यक्ती, वंचित, उपेक्षित घटक अशा प्राधान्य क्रमानुसार साक्षरता मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांची संख्या मोठी आहे. शिक्षण विभागातर्फे सेवानिवृत्त शिक्षकांना आवाहन करून या उपक्रमात सहभागी करून घेतल्या जाणार आहे. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी. अभ्यासक्रम ठरवून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्यास या नव भारत साक्षरता उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले.
निरक्षरांच्या प्रगतीसाठी एनसीईआरटीमार्फत अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार आहे. तसेच दोन टप्प्यात निरक्षरांच्या प्रगतीची तपासणी करण्यात येणार आहे. या परीक्षा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे घेतल्या जाणार आहे. निरक्षरांना साक्षर करण्यासाठी या उपक्रमांत स्वयंसेवकांची भूमिका महत्वाची राहणार आहे. या कार्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.
बैठकीला योजना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मारोती गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. खरात, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्र. द. राठोड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी ज. भा. आढाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे आदी उपस्थित होते.