पो. डा. वार्ताहर , वाशिम : २६ जुन हा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमच्या वतीने ३ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे दक्षता पथक कॅम्प आयोजन करण्यात आले. या कॅम्पच्या माध्यामातून ३५ प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. कॅम्पच्या माध्यमातून तात्काळ प्रकरणे निकाली काढण्यासाठी चौकशी अहवाल समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. १० जुलै रोजी सेवा व निवडणूकविषयक प्रकरणी त्रुटीपूर्तता शिबीर घेण्यात आले आहे. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला.
सामाईक परीक्षा-२०२३ चा निकाल जाहीर झाला असून सामाईक परीक्षेनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. चालू महिन्यात विद्यार्थी प्रकरणी प्रस्ताव मोठ्या प्रमाणात झाले आहे. प्रस्तावांवर समितीने तातडीने कार्यवाही होण्याच्या दृष्टीने काही प्रकरणांची तपासणी करून काही प्रकरणे निकाली काढली. परंतु ज्या प्रकरणांत जाती दावा सिध्द करणारे पुरेसे पुरावे जोडलेले नाहीत,अशा ३० प्रकरणांची आज १२ जुलै रोजी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणांवर निर्णय घेतला जाणार आहे. जात वैधता प्रमाणपत्रामुळे कोणताही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, हा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा प्रयत्न असल्याचे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम यांनी कळविले आहे.