पो. डा. वार्ताहर परभणी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उभारण्यात आलेल्या दर्गा रोड परिसरातील नवीन स्त्री व नवजात रुग्णालयाचे डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. सुभाष रोड, परभणी या परिसरात कार्यान्वित असलेले जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्णालय आता आज (दि.10 जूलै) पासून स्री व नवजात शिशु रुग्णालय (एमसीएच विंग) म्युनिसीपल कॉलनी, बँक कॉलनीच्या बाजुला, दर्गा रोड, परभणी येथील नवीन इमारतीत स्थलांतरित करुन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील माता व बालकांना आता उपचारासाठी बाहेरील जिल्ह्यात जाण्याची गरज पडणार नाही. तसेच या नवीन स्त्री व नवजात शिशु रुग्णालयामुळे जिल्ह्यातच आजपासून आरोग्यविषयक सर्व अत्याधुनिक आरोग्य सोयीसुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी बी. सुक्रे यांनी माहिती दिली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आजपासून या नवीन स्री व नवजात शिशु रुग्णालयात महिलांसाठी प्रसुती, सिझेरियन शस्त्रक्रिया, स्री-रोगांवरील सर्व प्रकारचे उपचार, नवजात शिशुंचा अतिदक्षता कक्ष, जन्म दाखला इत्यादी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. सदर रुग्णालयावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी यांचे नियंत्रण असणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व लाभाथी, स्त्री रुग्णालयात रुग्ण संदर्भीत करणारे, खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, खाजगी रुग्णवाहिका चालक, आशाताई व सर्व संबंधितांनी या संदर्भात सर्व रुग्ण जिल्हा रुग्णालय, परभणी या परिसरात संदर्भीत न करता नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या स्री व नवजात शिशु रुग्णालय (एमसीएच विंग), म्युनिसीपल कॉलनी, बँक कॉलनीच्या बाजुला, दर्गा रोड, परभणी या नवीन पत्यावर संदर्भीत करावेत. तसेच सर्व लाभार्थींना याबाबत आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, परभणीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी बी. सुक्रे, जिल्हा रुग्णालय, परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बन आणि स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल पवार यांनी केले आहे.