पालकमंत्र्यांच्या हस्ते 5 जुलैला विद्युत रोषणाईचे लोकार्पण
पो. डा. वार्ताहर चंद्रपूर : चंद्रपूर येथील राम सेतू पुलाला आता आकर्षक रोषणाईची झळाळी मिळणार आहे. येत्या बुधवारी (दि. 5 जुलै) सायंकाळी 6 वाजता राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते केबलस्टे पुलावरील या दर्शनीय विद्युत रोषणाईचे लोकार्पण होणार आहे.
चंद्रपूर येथील दाताळा मार्गावरील इरई नदीवरील पूल आता विद्युत रोषणाईने झळाळणारा देशातील तिसरा पूल असेल. देशातील सर्वांगसुंदर विद्युत रोषणाई असलेला पूल आपल्या जिल्ह्यात असणार आहे, याचा अभिमान असल्याची भावना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई आणि पणजीच्या (गोवा) धरतीवर हा रामसेतू उभारण्यात आला आहे. या पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई असणार आहे. चंद्रपूर शहरातील नागरिकच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा ही रोषनाई आकर्षित करणार आहे. या व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांना कुटुंबासह जाण्यासाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार असल्याची स्थानिकांची भावना आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या अग्रस्थानी ठेवण्याच्या दिशेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे जगातील मोठे पर्यटन केंद्र आहे. या केंद्राला जगभरातील पर्यटक भेटी देतात. आता रामसेतूवरील आकर्षण रोषणाई त्यांचेही लक्ष वेधून घेणार आहे, हे विशेष.