आमदार प्रतिभा धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
पो. डा. वार्ताहर चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन मध्ये काम करणाऱ्या गाईड व ड्रायव्हर यांना व्याघ्र प्रकल्पाच्या पावसाळी बंद काळात आर्थीक मदत करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी जग प्रसिध्द आहे. अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात, त्यांना गाईड व ड्रायव्हरच्या माध्यमातून उत्कृष्ठ पर्यटनाची संधी प्राप्त करुन दिली जाते. त्याच सोबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची संपुर्ण माहिती पर्यटकांना दिली जाते. परंतू दरवर्षी पावसाळयात तीन महिने कोर झोन मधील पर्यटन बंद असल्याने त्यावर रोजगार चालणाऱ्या ड्रायव्हर व गाईड यांना त्या काळातील मानधन मिळत नाही. कोराना काळात देखील शासनातर्फे यांना कुठलीही मदत देण्यात आलेली नव्हती.
या कर्मचाऱ्यांना संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषन व मुलांचे शिक्षण याच रोजगारातून करावयाचे असल्याने बंद काळात कुठलेही मानधन मिळत नसल्याने कुटुंबाचे पालनपोषन करायचे कसे असा प्रश्न भेडसावीत आहे. कोअर क्षेत्रात काम करण्याच्या गाईड व वाहनचालक यांना किमान अर्थ सहाय्य देऊन सहकार्य करावे, अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.