पो. डा. वार्ताहर वाशिम : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात 28 जून रोजी सांसदीय कार्यमंत्री तथा मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने मराठा समाजाकरीता कार्यरत असणाऱ्या व्याज परतावा योजनेची माहिती घेतली. तसेच या योजनेची कार्यपध्दी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचेकडून संगणकासमोर बसून घेतली. यावेळी श्री. पाटील यांनी राज्यातील 4 हजार 333 लाभार्थ्यांना 3 कोटी 75 लक्ष रुपये व्याज परताव्याची रक्कम स्वत: लाभार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन वितरीत केली. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री. पाटील यांनी एलओआय निर्माण करण्याची प्रक्रीया, कर्ज मंजूरीची प्रक्रीया व व्याज परतावा कशाप्रकारे करण्यात येतो याची सविस्तर माहिती समजून घेतली.
महामंडळाच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 61 हजार 411 लाभार्थ्यांना बँकेने वितरीत केलेल्या 4 हजार 367 कोटी रुपयांच्या कर्ज रक्कमेबाबत व महामंडळाने 50 हजार 285 लाभार्थ्यांना व्याज परतावा स्वरुपात वितरीत केलेल्या 456 कोटी रुपये रक्कमेचे अवलोकन करुन महामंडळाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. महामंडळाकरीता लवकरच नवी मुंबईसारख्या शहरामध्ये भव्य इमारतीकरीता जागा उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे श्री. पाटील यांनी महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटीप्रसंगी सांगितले.