आमदार सुभाष धोटेंची वनमंत्री मुनगंटीवाराकडे मागणी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा.
पो. डा. वार्ताहर राजुरा : — राज्य शासनाकडून वन विभागातील वनरक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेबद्दल स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगार युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतू दुसरीकडे मात्र परिक्षार्थी भरती प्रक्रिया शुल्कापोटी आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून येत आहे. या भरती प्रक्रिया टी.सी.एस. या खासगी कंपनी मार्फत राबविण्यात येत असून ऑनलाईन पध्दतीने ही परिक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अमागास प्रवर्गासाठी रुपये 1000/- आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अथान प्रवर्गासाठी रुपये 900/- एवढे परिक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. सदरची परिक्षा शुल्क रक्कम ही मोठी असून विद्यार्थ्यांना एवढे शुल्क भरणे कठीण आहे. आधीच बेरोजगार त्यातही हालाखीच्या परिस्थितीत अहोरात्र अभ्यास करुन हे विद्यार्थी परिक्षेला सामोरे जात आहे. मात्र भरमसाठ ठेवलेल्या शुल्कामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली असल्यामुळे स्पर्धा परिक्षांची वाढवलेली भरमसाठ परिक्षा प्रक्रिया शुल्क कमी करुन परिक्षार्थ्यांना दिलासा देणेसंदर्भाने राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिनांक २४/०६/२०२३ रोजी पत्र व्यवहार केला होता. परंतु याबाबत कोणतीही उचीत कार्यावाही झालेली दिसुत येत नाही.
अशातच ऑनलाईन सेवा विस्कळीत होत असल्यामुळे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करते वेळेस तांत्रिक अडचणी येत आहेत. तसेच कागदपात्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे बेरोजगार युवक युवतींमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वन विभागातील वनरक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया कमी करे पर्यंत ऑनलाईन अर्ज थांबवावीत किंवा मुदत वाढ देणेबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. तरी राज्य शासनानी वन विभागातील वनरक्षक भरती प्रक्रिया शुल्क कमी करे पर्यंत ऑनलाईन अर्ज थांबवावीत किंवा मुदत वाढ देणेसंदर्भाने तातडीने निर्णय घेवून राज्यातील बेरोजगार व होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच आ. धोटे यांनी यासंदर्भात पून्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन देऊन या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.