पो. डा. वार्ताहर पंढरपूर : आषाढी वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिरे सुरु आहे. मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज दुपारी तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिरास भेट दिली. उपस्थित वारकरी भाविकांना आषाढी एकादशी आणि वारीच्या शुभेच्छा दिल्या. आरोग्य विभागाने वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
राज्य शासनाने सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विषयक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना दीड लाखांऐवजी ५ लाख रुपये एवढे आरोग्य संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.