पो. डा. वार्ताहर #पंढरपूर : “बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, राज्यावरची सगळी संकटं, आरिष्ट दूर होऊ दे, राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, हे राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, राज्यातील सर्व समाजघटक सुखी, समाधानी झाला पाहिजे, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे” अशी प्रार्थना यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठूराया चरणी केली.
यंदा अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला. श्री. काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराजांसोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करतात.
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मानाच्या वारकरी दाम्पत्याला दिला जाणारा मोफत वार्षिक बस प्रवास पास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण आणि वारी संदर्भात छायाचित्रांचे संकलन असलेल्या ‘भू वैकुंठ’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.