पो. डा. वार्ताहर , वाशिम, : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने तुती लागवड पूर्व प्रशिक्षण अर्थात तुती रोप लागवडीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन वाशिम तालुक्यातील काकडदाती येथील श्रीरंग बक्षी यांच्या शेतात २४ जून रोजी करण्यात आले. तुती लागवडीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, व श्री. राऊत यांनी रेशीम विभागास मंजुरी दिली. कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव व वाशिम तालुक्यातील सन 2023-24 या वर्षात नवीन तुती लागवड करणारे शेतकरी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.
तुती लागवड तुती काड्याद्वारे केल्यास त्यामध्ये २०-२५ टक्के मर होते. त्यामुळे तुती रोपे ३ ते ३.५ महिन्याची वाढ झालेली लागवड केल्यास १०० टक्के जिवंत राहतात. त्यासाठी मनरेगाअंतर्गत ३ रुपये प्रती रोप प्रमाणे कुशलमधून ६ हजार रोपांची रक्कम १८ हजार रुपये दिली जाते. सिल्क समग्र-२ योजनेतून एकत्रित 1 एकर तुती लागवड व्यवस्थापनासाठी ४५ हजार रुपये दिले जातात. प्रती एकर ५ हजार ५०० रोप लावण्यासाठी खड्डे करण्याची आवश्यकता नसते, त्यासाठी नांगराने तीन फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्यानंतर 5 फूट पट्टा सोडून परत 3 फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीमध्ये 2 फूट अंतरावर रोपांच्या मुळांना बुरशीनाशकाची प्रक्रिया करून रोप लागवड करावी. या पद्धतीने लागवड करण्याचे प्रात्यक्षिक जिल्हा रेशीम विकास अधिकारी सु. प्र. फडके यांनी करून दाखविले. सोबत तुती लागवड करण्याबाबतच्या पुस्तिका शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी क्षेत्र सहायक सीमा जेनेकर, माधव बोरकर व नितेश राठोड यांनी सहकार्य केले.