पो. डा. प्रतिनिधी : आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाला नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारकरी भाविकांच्या सोयी- सुविधांसाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांनी गोपाळपूर येथील महाआरोग्य शिबिर, पत्रा शेड, श्री विठ्ठल – रूक्मिणी मंदिर, ६५ एकर या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच मंदीरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. यात्रेच्या पूर्वतयारीची पाहणी करुन आढावा घेणारे तसेच वारकरी आणि भाविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणारे एकनाथ शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत.
येत्या २९ जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा पंढरपूर येथे साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या मॅट, स्वच्छ पेयजल, आरोग्य, शौचालये आदी सुविधा तसेच, महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांसह अन्य आवश्यक बाबींचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला.
गत महिन्यात घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीत यावर्षीची आषाढी वारी अतिशय नियोजनबद्ध झाली पाहिजे, वारकरी संप्रदायाची कुठल्याही प्रकारची गैरसोय, अडचण होऊ नये, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार नियोजनात त्रृटी राहणार नाहीत, याची पाहणी करण्यासाठी स्वतः आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी – सुविधांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. दर्शन रांगेमध्ये भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून मंडप उभा केला आहे. पंख्यांची व्यवस्था केली आहे. यामुळे त्यांचे ऊन – पावसापासून संरक्षण होईल. एसटीच्या जादा गाड्या, वारकऱ्यांच्या वाहनांसाठी पथकर माफी अशा सुविधांसह यावर्षी वारकऱ्यांचा प्रथमच विमा काढला आहे. तसेच, वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. पोलिसांनी देखील भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले तसेच मंदिर समितीमार्फत भाविकांना श्री विठ्ठलाचे सुलभ व जलद दर्शन व्हावे, यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत माहिती दिली. मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री. शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दर्शन रांगेत वारकरी भक्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आपण भाग्यवान आहोत की आषाढी वारीची पूजा करण्याचे भाग्य आपणास लाभले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार सर्वश्री समाधान आवताडे व राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.