निशुल्क क्रमांक १८००-२३३४००० वर संपर्क करा
पो. डा. वार्ताहर परभणी : राज्यातील शेतक-यांनी यंदा खरीप हंगामातील पीक पेरणीचे नियोजन करताना मुबलक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. कारण हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला असून, राज्यात सामान्यपणे २४ ते २५ जूनला पाऊस येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली असल्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी मान्सूनचे आगमन झालेले नाही. सद्यस्थितीत जून महिन्यात आतापर्यंत १३८.४० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात १६.४० मि.मी. (सरासरी ११ टक्के) पाऊस पडला आहे. तसेच खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १५२.९७ लाख हेक्टर असून २० जूनअखेर प्रत्यक्षात १.९८ लाख हेक्टर (१.३० टक्के) पेरणी झाली आहे.
राज्यामध्ये मान्सूनच्या आगमनास उशीर होत असल्यामुळे शेतकरीवर्ग काळजीत आहे. त्यामुळे शेतक-यांनी पेरणी करताना घ्यावयाची दक्षता व आपत्कालीन पिक परिस्थितीत करावयाच्या नियोजनाबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपर मुख्य सचिव (कृषी) अनुप कुमार, आयुक्त (कृषी) सुनील चव्हाण, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि भारतीय हवामान विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ के. एस. हौसळीकर यांच्या समवेत नुकतीच बैठक घेतली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ व २५ जूननंतर अरबी समुद्रवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतक-यांनी ८० ते १०० मि.ली. पाऊस पडल्याशिवाय सर्वसामान्य पेरणी करण्यात येऊ नये. शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये. तसेच साधारणपणे २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करावी. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन (मल्चींग) सारख्या तंत्राचा वापर करावा.
हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल. कृषि विद्यापीठ, कृषि विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येत आहे. क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. राज्यात मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीवेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व किटकनाशके शेतक-यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे.
शेतक-यांना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणा-या कृषी निविष्ठांचा साठा उपलब्ध होईल, यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतक-यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्तालय स्तरावर २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकरी १८००-२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.