पो. डा. परभणी, दि.२३ : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या अपघातांचे प्रमाण पाहता रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या वर्षांभरातील एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुचाकीचालकांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे अन्यथा मोटार वाहन कायदानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी केले आहे.
शासकीय, निमशासकीय आस्थापना व कॉलेज प्रमुखांनी कार्यालय, आस्थापना आवारात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणाऱ्यास प्रतिबंध करावा. तसेच १९४ (ड) च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीकोणातून कार्यालय, आस्थापनेतील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून किंवा अन्वये कुठल्याही पुराव्यासह विनाहेल्मेट दुचाकीवर येणाऱ्या सर्व वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व वाहनधारकांनी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा, असेही त्यांनी कळविले आहे.
वाहनासंबंधीचे वैध कागदपत्रे सोबत बाळगावी, मोटार वाहन कायदा व तरतुदींची अंमलबजावणी करावी अन्यथा सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघातांमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी अथवा मृत होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हेल्मेट वापरासंबंधी व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. मोटार वाहन कायदाच्या तरतुदीनुसार हेल्मेट वापरणे प्रत्येक दुचाकी वाहनधारकास अनिवार्य आहे. हेल्मेट न वापरल्यास त्याला कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. हेल्मेट न वापरल्याबद्दल दुचाकीचालक व स्वारास एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यापर्यंत लायसन्स रद्द करण्यात येईल. कलम १९४ (ड) अन्वये हेल्मेट मोटारसायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली असून त्यांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे मोटार सायकल चालविताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.