पो.डा. वार्ताहर, नागपूर :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड कार्यक्रमाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा परिषद, कृषी, सिंचन, सामाजिक वनीकरण विभागाने परस्पर समन्वयातून बांबू रोप लागवडीकडे वळले पाहिजे. जुलै महिन्यात या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हाभर बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ केला जाईल. याच्या यशस्वीतेसाठी संबंधित विभाग प्रमुखांनी अधिक तत्पर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बांबू लागवड 2024-25 अभियानासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना कडू, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी.व्ही. सयाम, सामाजिक वनीकरण, सिंचन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, कृषी विभाग, नगर परिषद, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत असलेल्या शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रातील जागांवर बांबू लागवडीसाठी मोठी संधी आहे. याच बरोबर शेतकऱ्यांनीही आपल्या शेत जमीनीच्या बांधावर बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील. बांबू लागवडीकडे व्यापक लोकसहभागातून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक वनीकरण विभागाकडे बांबूची रोपे उपलब्ध आहेत. ही रोपे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या 47 निवडक तलावांच्या परिसरात लावली जाणार आहेत. एकूण 400 हेक्टर क्षेत्रापैकी 150 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीची जबाबदारी कृषी विभागाने तर सूमारे 300 हेक्टर जमीनीवर जिल्हा परिषदेने स्विकारली आहे. नगर परिषदेअंतर्गत असलेल्या डपिंग ग्राऊंडवर बांबू लागवडीसाठी मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिल्या.