पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर :
जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे 19 जून ते 19 जुलै पर्यंत पोलिस भरती प्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती करीता जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरीत उमेदवार येणार आहे. या दरम्यान उमेदवारांची जिल्हा स्टेडियम समोरील रस्त्याने आगमन व निर्गमन होणार असल्याने उमेदवारांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने मुंबई पोलिस अधिनियम -1951 च्या कलम -33(1 ) ब नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाचे नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये, 19 जून रोजी सकाळी 5 ते संपूर्ण पोलिस भरती संपेपर्यंत स्टेडियम समोरील गेट न. 1 व 2 चा संपूर्ण रस्ता तसेच स्विमींग टॅंकच्या बाजूला गेट नं. 3 च्या समोरील पूर्ण रस्ता हा वाहतुकी करीता बंद करण्यात येत आहे.
सदर मार्गावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतीरिक्त इतर कोणत्याही नागरीकांनी या रस्त्यावर आपले वाहन पार्किंग करू नये. तसेच जिल्हा स्टेडियम परीसरामध्ये पोलिस भरतीला आलेल्या उमेदवरा व्यतिरीक्त इतर नागरीकांनी विनाकारण जिल्हा स्टेडियमच्या आजुबाजुला गर्दी करू नये. वरील निर्देशचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.