पो. डा. वार्ताहर: 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण पूर्व कार्यक्रम 1 जून ते 16 ऑक्टोबर या कालावधीकरीता जाहीर झालेला आहे. 17 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे व अंतिम प्रसिध्दी 05 जानेवारी 2024 रोजी करावयाची आहे त्याकरिता दावे, हरकती दाखल करावयाचा कालावधी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असा असणार आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरीकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदार नोंदणी करतेवेळी कागदपत्रासह आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.
नागरिकांच्या सोईसाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी www.nvsp.in ही वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना भारत निवडणूक आयोगाचे Voter Helpline App मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे देखील मतदार नोंदणी घरबसल्या करता येईल. त्याचप्रमाणे नागरिकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी बी. एल. ओ यांच्याकडे देखील ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करिता अर्ज सादर करता येईल.
नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील सर्व नागरिकांना 1 जून ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आपले मतदार ओळखपत्र दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणी, मतदार यादीतील नाव कमी करणे अशी सर्व कामे करता येणे सहज शक्य होईल. छायाचित्रासह मतदान यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले आहे.