वाशिम दि.21 : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव दोनच्या वतीने मालेगाव तालुक्यातील बचत गटांच्या अतिगरीब 80 महिलांना अल्प व्याजदरातील तेजश्री फायनान्शिअल सर्विसेसच्या माध्यमातून 8 लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या दारी जाऊन उपलब्ध करून देण्यात आले.
20 जून रोजी तहसील कार्यालय मालेगाव येथे आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय विभागाने नागरिकांना लाभ देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित झनक होते.यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा परिविक्षाधीन तहसीलदार मिन्नू पी.एम.,तहसीलदार दीपक पुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालीत साधन केंद्र मालेगाव एक व दोन कार्यालयाने सहभाग नोंदवून 11 बचतगटाचे स्टॉल उभारून नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प तेजस्वी फायनान्शिअल सर्विसेस बँक कर्ज, विविध विभागाच्या योजना, दिव्यांगासाठीचा स्पार्क प्रकल्प याविषयी नागरिकांना माहिती उपलब्ध करून दिली .
यावेळी लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक प्रा.शरद कांबळे यांनी आमदार अमित झनक, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा परिविक्षाधीन तहसीलदार मिन्नू पी.एम,तहसीलदार दीपक पुंडे यांना माविमच्या वतीने देण्यात आलेल्या लाभाची माहिती दिली.हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी व्यवस्थापक प्रा.शरद कांबळे, लेखापाल लता इंगळे,सहयोगिनी पुष्पा नलगे,पुष्पा गवळी, सुनीता सुर्वे चंद्रभागा माने, जया गायकवाड, भारती चक्रनारायण,उपजीविका सल्लागार अविनाश इंगळे, सतिश इंगळे,डी.आय.एफ.राधिका भोयर, अमोल जाधव, सहयोगीनी पुष्पा अंभोरे,सुनिता सावळे,बेबी गायकवाड यांनी परिश्रम घेतले .