शिक्षणमहर्षी स्वर्गीय रामचंद्र सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त भांडुप येथील नवजीवन विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या पुतळ्याचे आज मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. माजी मंत्री डॉ.दीपक सावंत लिखित ‘गुलदस्ता’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
राज्य शासनाने मुंबईचा कायापालट करून स्वच्छ, सुंदर मुंबई करण्याचे अभियान हाती घेतले आहे. मुंबई शहर-उपनगरांतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येईल आणि त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५० रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे. भांडुप आणि परिसरातील पुनर्विकासाचे प्रकल्प, रस्ते, नाला सफाई तसेच सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. विक्रोळी येथे ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली असून या भागातील नागरिकांसाठी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
माजीमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी कोरोना काळात विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेले स्तंभलेखन पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. त्यांचे कुपोषण निर्मूलनातील योगदान उल्लेखनीय आहे, हे लक्षात घेऊन डॉ. सावंत यांची राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
स्व. प्राचार्य सावंत यांनी लावलेल्या नवजीवन संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.