वाशिम, दि. 20 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हयाकरीता विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ९५ तसेच बिजभांडवल योजनेअंतर्गत ९५ कर्ज प्रकरणे अशा एकुण १९० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता दिले आहे.
विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत असून यामध्ये जास्तीत जास्त १० हजार रुपये रक्कम अनुदान स्वरुपात महामंडळामार्फत देण्यात येते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्ज म्हणून देण्यात येते. तसेच बिज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये महामंडळामार्फत २० टक्के रक्कम बिज भांडवल कर्ज म्हणून वार्षिक व्याजदर ४ टक्के दराने १० हजार रुपये अनुदानासह देण्यात येते. ७५ टक्के रक्कम बँकेमार्फत कर्ज म्हणून देण्यात येते. यामध्ये ५ टक्के रक्कम अर्जदाराची सहभाग रक्कम म्हणून स्विकारण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड/ व्यवसायाच्या जागेचा पुरावा/पासपोर्ट फोटो/बँक पासबुकची झेरॉक्स/दरपत्रक वाहन व्यवसायाकरीता ड्रायव्हिंग लायसन्स परिमिट आदी कागदपत्रे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर वाशिम येथील दूरध्वनी क्रमांक 07252-231267 किंवा कार्यालयीन ईमेल- dm.washim@mpbcdc.in वर संपर्क साधावा. असे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.