परभणी, दि.२०: राज्य शासनाकडून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, ‘१०० दिवस दिव्यांगांसाठी’ ही विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाकडून एप्रिलपासूनच यशस्वीपणे सुरु आहे. आता दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘दिव्यांगांच्या दारी’ या हा उपक्रम राबविला जात असून, या विशेष मोहिमेतून आतापर्यंत तब्बल ५ हजार ८०० दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्राचे वितरण करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी येथे सांगितले.
दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदिप घोन्सीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बन, मनपाचे उपायुक्त श्री. जगताप, गटविकास अधिकारी श्री. केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे, महात्मा गांधी सेवा संघाचे सचिव विजय कान्हेकर, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी राहुल शिवभगत, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद लांडे, समाज कल्याण विभागाचे सय्यद हुसेन उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती वैश्विक ओळखपत्र तसेच शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन महात्मा गांधी सेवा संघाच्या संयुक्त उपक्रमातून सर्वेक्षणाचे काम एप्रिल २०२३ पासून सुरु आहे. हे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या संकल्पनेतून सुरु आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, मानवत व सेलू येथे दिव्यांगांसाठी स्वतंत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून आतापर्यंत ५ हजार ८०० दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगाचे प्रमाणपत्र घरपोच वितरीत करण्यात आले असल्याचे श्रीमती गोयल यांनी सांगितले.
‘१०० दिवस दिव्यांगांसाठी’ हे अभियान जिल्ह्यात यंत्रणा अतिशय उत्कृष्टरित्या व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शहरी भागातील दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र घरपोच देण्यासाठी जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्यापासून कार्यवाही करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार यांना सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच बौद्धिक अक्षमता या दिव्यांगांच्या तपासणीसाठी १५ ते ३० जुलै २०१३ हा कालावधी राखीव ठेवण्याच्या शल्य चिकित्सक डॉ. बन यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ३ ते १० जुलै २०१३ पर्यंत कर्णबधिरांची जलदगतीने तपासणी करून वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी ‘१०० दिवस दिव्यांगांसाठी’ या अभियान अंतर्गत कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
याशिवाय अतितिव्र दिव्यांगत्वाने ग्रासलेल्या दिव्यांग व्यक्ती किंवा बालकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र काढून त्यांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यासाठी महात्मा गांधी सेवा संघाचे सचिव विजय कान्हेकर यांनी एसओपी तयार करण्याबाबत चर्चा केली. तसेच प्रामुख्याने दिव्यांगांना ओळखपत्र देणे, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, नॉन क्रिमीलेअर, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी महसुली व इतर कागदपत्रे एकाच छताखाली देण्यासाठी १ जुलै २०२३ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी २३ मे २०२३च्या शासन निर्णयानुसार आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, ते मुख्य मार्गदर्शक आहेत. या अभियानाची सुरुवात ७ जून २०२३ रोजी मुंबई येथून करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबविताना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिकेचे आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य असून, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव आहेत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सदस्य सचिव शिवानंद मिनगीरे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी यांचे आभार मानले. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सय्यद हुसेन, राहुल शिवभगत, विजय कान्हेकर यांच्यासह दिव्यांग शाळेतील सर्व विशेष शिक्षक तालुका समन्वयक तसेच वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता या पदावर नव्याने रुजू झालेले दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख प्रल्हाद लांडे यांचा सत्कार करण्यात आला.