जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वात मोठा स्वीप कक्ष पाहण्यासाठी नागरिकांना आवाहन
पो.डा. वार्ताहर,अहमदनगर :
भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदान निवडणूक प्रक्रिया निरंतर चालू आहे.लोकशाहीचे महत्त्व वारंवार अधोरेखित करण्यासाठी स्वीप सारखा उपक्रम फार महत्त्वाचा आहे.अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा स्वीप मंडपमप हा कक्ष मतदार जनजागृतीतील इतिहास ठरू शकतो. “असे प्रतिपादन रवी कुमार अरोरा निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांनी केले.
या कक्षाच्या निरीक्षणाप्रसंगी श्री अरोरा यांनी मतदार जनजागृतीच्या खेळांचा आनंद घेतला.त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात स्वीप समितीच्यावतीने मतदार जनजागृतीच्या शेकडो संकल्पना असलेला सुमारे सहा हजार स्क्वेअर फुटांचा स्वीप कक्ष उभारण्यात आलेला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांना डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) यांनी कक्षाची माहिती दिली.
भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचे विविध जनजागृती पर पोस्टर्स,मतदान प्रक्रिया साध्या सोप्या सुलभ पद्धतीने दाखवणारे मुलांसाठीचे मनोरंजक खेळ,माझी सही-माझी लोकशाहीचा शंभर टक्के मतदानाची सही असलेला उपक्रम,बाराखडीतून लोकशाही शिक्षण,अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचे विविध उपक्रम,में भारत हूँ- वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंट्स,क्यू आर कोड वॉल,व्ही आर बॉक्सरचना,व्हीव्हीपॅट मशीन विषयक साक्षरता,मतदानाची नोटा पद्धत,भारतातील पहिला स्वीप केअर व्हॉट्सअप क्रमांक,आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्यासाठी चित्रकला स्पर्धेतील पोस्टर्स,मतदार मार्गदर्शिका,राष्ट्रीय व राज्य सदिच्छा दूत यांचे संदेश,विविध अँप ची माहिती,मतदान प्रक्रियेतील घटकांच्या चिकाटी व गुणवत्तेचे प्रतीक असलेली एकी नावाची मुंगी,सिनेमा व मालिकेतील गाजलेले संवाद व प्रसंगांवर आधारित मतदार जनजागृतीचे पोस्टर्स ,भारत निवडणूक आयोगाची ऑनलाइन शपथ घ्या व प्रमाणपत्र मिळवा उपक्रम ,मतदानासाठी ग्राह्य असणारी ओळखपत्रे व पुरावा,मतदानाच्या पायऱ्या दर्शवणारा स्टापू खेळ,नैतिक मतदानाचा सापशिडीचा खेळ,मतदान प्रक्रियेतील विविध अर्ज शोधण्याचा भुलभुलय्या खेळ,मतदान वर्णमालेचा तंबोला खेळ,चालत सहज सुलभ मतदान पद्धती खेळ,आदी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम या कक्षामध्ये आहेत.
“विविध शासकीय कामानिमित्ताने जिल्हाभरातील व बाहेरील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देत असतात.जिल्ह्याचे मुख्यालय असलेले या इमारतीत हा कक्ष स्थापन होताना नागरिकांचे प्रबोधन व्हावे असा स्वीप समितीचा मानस आहे.गेल्या एक महिन्यापासून १० जून २०२४ हा कक्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून शिक्षक पालक यांनी आपल्या मुलांसह या कक्षाला जरूर भेट द्यावी,खेळ खेळावेत व लोकशाही प्रक्रियेची माहिती घ्यावी.” असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले आहे.
उपक्रमासाठी राहुल पाटील(उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ),अशोक कडूस(स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी) ,मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),आकाश दरेकर(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार)व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे .