पो.डा. वार्ताहर, पुणे :
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून १५ मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५०५ तक्रारींपैकी १ हजार ३२९ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित १७६ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वीत आहे.
सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. अशा प्रकारे १५ मार्चपासून आतापर्यंत १ हजार ५०५ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १ हजार ३२९ तक्रारींवर कारवाई तर उर्वरित १७६ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते.
सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारी व कंसात कारवाई झालेल्या तक्रारी
आंबेगाव विधानसभा-२३ (१६), बारामती-५४ (३०), भोर-३ (२), भोसरी-४ (३), चिंचवड-३३ (२२), दौंड-२८ (१९), हडपसर-४७ (४०), इंदापूर-४७ (४०), जुन्नर-३७ (३५), कसबापेठ-२४७ (२२३), खडकवासला-७८ (७१), खेड आळंदी-३ (१), कोथरूड-४३ (३२), मावळ-४५ (३०), पर्वती-२५८ (२५७), पिंपरी-११ (९), पुण कॅन्टोन्मेंट-१०९ (९१), पुरंदर-११ (८), शिरूर-३२ (१५), शिवाजीनगर-७१ (७०) व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात – ३२१ (३१५) अशा एकूण १ हजार ५०५ तक्रारी प्राप्त झाल्या व १ हजार ३२९ तक्रारींवर कारवाई झाली.
जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आणि १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.
0000