अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी
मतमोजणी केंद्र व विविध कक्षांची केली पाहणी
पो.डा. वार्ताहर, जालना :
जालना लोकसभा मतदारासंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी आज जालना एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरुमची पाहणी केली. तत्पुर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुकीशी संबंधित विविध कक्षांना भेट दिली.
डॉ. कुलकर्णी यांनी स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था असल्याची पाहणी करताना सुरक्षा व्यवस्थे संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करून सुरक्षा विषयक बाबींचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेला परिसर सुरक्षित करण्यास त्यांनी सांगितले. मतमोजणी केंद्रावर सुरळीत विद्युत पुरवठा, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्नीशामक दल, स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याचे पाणी या सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या.
तत्पुर्वी डॉ. कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या कामाकरीता गठीत विविध कक्षांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. मिडिया कक्ष, उमेदवार यांचे खर्चविषयक व्यवस्थापन कक्ष, पोस्टल मतदान कक्षाची त्यांनी पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्याकंडून कामाकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा स्ट्रॉंग रूम नोडल अधिकारी सोहम वायाळ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता पवार व संबंधित कक्षाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.