प्रत्येक तालुक्यात 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा
पो.डा. वार्ताहर, अकोला :
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा दि. 20 मेपूर्वी सादर करावा व संबंधित विभागांकडून, तसेच प्रत्येक तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष दि. 1 जूनपासून सुरू करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
मान्सून पूर्वतयारी सभा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, विविध यंत्रणांचे अधिकारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन समन्वय अधिकारी संदीप साबळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, आरोग्य विभाग,पाटबंधारे विभाग, सा. बांधकाम विभाग, महापालिका, नगरपालिका, तहसील कार्यालय आदींनी दि. 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली यंत्रणा व साधने सुस्थितीत असल्याबाबत खातरजमा करून तसे प्रमाणपत्र, अहवाल दि. 30 मेपूर्वी सादर करावा.
पर्जन्यमापक (रेनगेज) उपकरणांचे ठिकाण बदलण्याची आवश्यकता आहे का, हे तपासावे. जिथे पाऊस पडतो तिथे ते नसल्यामुळे नोंदी होऊ शकत नाहीत, अशी तक्रार होते. त्यामुळे ही यंत्रणा योग्यठिकाणी व सुस्थितीत असल्याची खातरजमा करावी.
सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर वृक्ष वाढणे, लिकेजेस असल्यास पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करावी. राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यांच्या कामांमुळे निर्माण झालेला राडारोडा तिथे बाजूला साचून राहतो. त्यामुळे जवळच्या शेतात पाणी शिरते. असे कुठे असल्यास ते तत्काळ कार्यवाही करावी. एकही शेतक-याचे नुकसान होता कामा नये, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिका-यांनी केली.
संपर्क व समन्वय यंत्रणा बळकट करा
आपत्तीकाळात संपर्क व समन्वय अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे धरणांतून विसर्ग वाढला तर आधीच सूचना सर्वत्र पोहोचावी. ही काळजी सर्व शहरांतही घ्यावी. कधीकधी पाऊस कमी असला तरी पाणी शहरात शिरते. नागरिकांच्या साहित्याचे नुकसान होते. त्यामुळे नगरपालिका, महापालिकेने ‘अलर्ट सिस्टीम’ प्रभावी करावी. वारंवार आपत्तीची घटना घडणा-या ठिकाणी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींमार्फत सूचनाफलक लावावेत. तहसीलदारांनी आपत्ती निवारे सुस्थितीत असल्याचे तपासून तसे प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
नालेसफाई 30 मेपूर्वी पूर्ण करा
नालेसफाई, नदी- नाल्याच्या प्रवाहास अडथळा ठरणारे अतिक्रमण काढणे, घनकचरा व्यवस्थापन, धोका टाळण्यासाठी वाळलेली झाडे तोडणे ही कार्यवाही महापालिका, नगरपालिकेने दि. 30 मेपूर्वी पूर्ण करावी. सर्व रूग्णालये व प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरोग्य पथके, पुरेसा औषध साठा, रूग्णवाहिका सुसज्ज ठेवण्याची खबरदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिका-यांनी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने नादुरूस्त पूल, रस्ते व नुकसान झालेल्या सुविधांची तत्काळ दुरूस्ती करावी. या काळात वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता ‘महावितरण’ने घ्यावी.
पोलीस विभागाने नियंत्रण कक्ष, वायरलेस यंत्रणा सुसज्ज ठेवावा. जिल्हा, तहसील, सर्व नगरपालिका, अग्निशमन दल, पोलीस व होमगार्ड विभागांतील शोध व बचाव पथकांकडील सर्चलाईट, रबरी नावा, लाईफ जॅकेट आदी यंत्रणा सुव्यवस्थित असल्याची खात्री करावी. सर्व ठिकाणी शुद्ध पेयजलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी क्लोरीनेटेड पाणी, यंत्रणेच्या आवश्यक दुरुस्त्या जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पूर्ण करून घ्याव्यात. एसटी महामंडळाने वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृ्ष्टीने आवश्यक पर्यायी मार्ग आदी आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. बैठकीत अनुपस्थित राहणा-या अधिका-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले.
गत दहा वर्षांची आकडेवारी पाहता जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 693.7 मिमी आहे. जिल्ह्यात 52 महसूल मंडळ स्तरावर रेनगेज व ॲटोमॅटिक वेदर स्टेशन यंत्रणा कार्यान्वित आहे. जिल्ह्यात पुरामुळे बाधित होणारी 82 गावे आहेत. वारंवार आपत्कालीन स्थिती उद्भवलेली 9 ठिकाणे आहेत. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार सुसज्जता ठेवावी व कुठेही हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.