मान्सून कालावधीत पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
पो.डा. वार्ताहर,सिंधुदुर्ग :
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज असणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून ठेवावा, गावात कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास (०२३६२)२२८८४७ /१०७७ या क्रमांकावर देण्याच्या सूचना आपल्या प्रत्येक गावातील ग्रामसेवकांना देण्यात याव्यात,तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. तसेच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे/ फांद्या मान्सून कालावधीपूर्वी बाजूला करण्यात याव्यात, मान्सूनपूर्व कालावधीत महामार्गाच्या दुतर्फा साईड पट्टी ,मातीचा भराव टाकावा, राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक व अपघातप्रवण जागांची निवड व या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईची कामे त्वरित हाती घेण्यात यावीत व पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करावीत, नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी करून घेण्यात यावी, पावसाळा कालावधीत नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होईल याबाबत दक्षता घेण्यात यावीत, मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहील याची दक्षता घेण्यात यावी, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी, पावसाळा कालावधीतील साथीच्या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती तालुक्यास उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करावा असेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, पावसाळ्या दरम्यान उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत जनजागृती करावी, मृत जनावरांची विल्हेवाट लावावी, सूक्ष्म नियोजन करुन परिस्थिती हाताळावी असेही ते म्हणाले.
बैठकीच्या सुरूवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुकटे यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प माहिती, मान्सून कालावधीतील मुख्य धोके, पूर येण्याची कारणे, दरड कोसळण्याची कारणे, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शोध व बचाव करिता घेण्यात आलेल्या साहित्याची सद्यस्थिती आदींची माहिती दिली.