पो.डा. वार्ताहर, पुणे : लोकसभा मतदार संघांतर्गत पर्वती विधानसभा मतदार संघात ८९ मतदारांनी अर्ज क्रमांक १२ डी भरुन गृह मतदानासाठी नोंदणी केली होती. सॅलिसबरी पार्क येथील ९९ वर्षाच्या मतदाराच्या निवासस्थानी मतदान प्रक्रिया सुरु असताना जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अचानक भेट देऊन मतदानाच्या कामकाजाची पाहणी केली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून यावर्षीच्या निवडणुकीपासून प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. त्याअनुषंगाने ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करु शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
पर्वती विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकाद्वारे गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. या पथकामध्ये पथक प्रमुख, सहायक पथक प्रमुख, सूक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर असे सहा सदस्यांचा समावेश होता..
जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी पथकाकडून मतदान प्रक्रीयेची माहिती घेतली. मतदानाची गोपनियता राखण्यासोबत संपूर्ण गृहमतदान प्रक्रीयेविषयी पथकाला प्रशिक्षण देण्यात आल्याचे श्री. आवटे यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांना सांगितले. यावेळी मतदान करणाऱ्या वयोवृद्ध मतदारांनीही आयोगाने केलेल्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले.