पो.डा. वार्ताहर, लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात 19 लाख 77 हजार 42 मतदारांपैकी 12 लाख 37 हजार 355 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यामुळे जिल्ह्यात 62.59 टक्के मतदान झाल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच सर्व मतदान यंत्रे लातूर येथील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमधील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली असून याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 3 लाख 24 हजार 303 मतदारांपैकी 2 लाख 11 हजार 711 मतदारांनी म्हणजेच 65.28 टक्के मतदारांनी मतदान केले. लातूर शहर विधानसभा क्षेत्रातील 3 लाख 84 हजार 980 मतदारांपैकी 60.77 टक्के म्हणजेच 2 लाख 33 हजार 934 मतदारांनी आपला हक्क बजाविला. अहमदपूर विधानसभा क्षेत्रात 3 लाख 38 हजार 614 मतदारांपैकी 2 लाख 13 हजार 726 मतदारांनी (63.12 टक्के), उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 3 लाख 12 हजार 865 पैकी 1 लाख 98 हजार 62 मतदारांनी (63.31 टक्के), निलंगा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील 3 लाख 22 हजार 728 मतदारांपैकी 2 लाख 146 मतदारांनी (62.02 टक्के) आणि लोहा विधानसभा क्षेत्रातील 2 लाख 93 हजार 552 मतदारांपैकी 1 लाख 79 हजार 776 म्हणजेच 61.24 टक्के मतदारांनी मतदान केले.
मतदारसंघातील एकूण 10 लाख 35 हजार 376 पुरुष मतदारांपैकी 6 लाख 64 हजार 630 पुरुष मतदार (64.19 टक्के), 9 लाख 41 हजार 605 महिला मतदारांपैकी 5 लाख 72 हजार 700 महिला मतदारांनी (60.82 टक्के) आणि 61 तृतीयपंथी मतदारांपैकी 25 मतदारांनी (40.98 टक्के) आपला हक्क बजाविला.