पो.डा. वार्ताहर, अमरावती :
अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने विमानतळाची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे. अमरावतीमध्ये अत्याधुनिक विमानतळ निर्माण होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी मिशनमोडवर कामे पूर्ण करुन प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे बेलोरा विमानतळ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडेय, पोलीस अधिक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अग्निशमन अधिकारी कुलदीप काळे, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी.आर. देशमुख, मयुर जिरापूरे, आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की, विमानतळाचे अद्ययावतीकरणाची जबाबदारी शासनाने ‘एमएडीसी’कडे सोपविलेली आहे. त्यानुसार विमानतळावर एटीआर-72 किंवा तत्सम प्रकारची विमाने उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टी विस्तार व रात्रीच्या वेळी विमाने उतरण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागाने समन्वयाने काम करावे. विमानतळाच्या रन-वेमध्ये येणारे वृक्ष तसेच वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या. तसेच विमानतळलगत असलेल्या घरांचे स्थानांतरण करण्यासाठी संबंधितासोबत चर्चा करुन आवश्यक ती उपाययोजना करावी. तत्पूर्वी एमएडीसीचे अधिकारी व तहसीलदार यांनी एकत्रित विमानतळलगतच्या भागाची पाहणी करुन अहवाल सादर करावा. विमानतळाच्या ठिकाणी दोन रुग्णवाहिकासह आवश्यक मनुष्यबळसह उपलब्ध करुन द्यावे. सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास पोलिस चौकी सुरु राहील यासाठी नियोजन करावे. तसेच येथील महावितरणाचे प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.