इतके वर्षात काँग्रेस पक्षाने केले नाही ते मोदींनी करून दाखविले
मंत्री छगन भुजबळ यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघात
पो.डा. चंद्रपूर : गावाचा विकास झाला की तालुक्याचा, तालुक्याचा झाला की जिल्ह्याचा, आणि जिल्ह्याचा झाला की राज्याचा विकास होतो; विकासाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते, तो फक्त सर्वसामान्यांचे हित बघत असतो. असाच सर्वसामान्यांचा हित बघणारा उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांची विकासदृष्टी आणि कामाची धडपड बघून येथील जनतेने त्यांना सर्वाधिक मतांनी निवडून द्यावे असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज केले. मुल आणि पोम्भूरणा येथे आयोजित सामाजिक संवाद सभेमध्ये ते बोलत होते. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ, भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री हरिश शर्मा, श्री प्रकाश देवतळे, सौ संध्याताई गुरुनुले, नामदेव डाहुले यांच्यासह महायुतीतील पक्षांचे विविध पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा कर्तबगार आणि कार्यक्षम नेता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे दिल्लीत जेव्हा नेतृत्व करेल तेव्हा निश्चितपणे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासारखाच संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विकास नंबर वन असेल असेही ना. भुजबळ यावेळी म्हणाले. ओबीसींच्या संरक्षणासाठी मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे-अजित पवार सरकार कटिबद्ध असून, मराठा समाजावर अन्याय होऊ न देता आरक्षणासाठी या सरकारची पावले सकारात्मक असल्याचा वापर देखील ना. भुजबळ यांनी यावेळी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची नावे न घेता ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांची दुटप्पी भूमिका यावर त्यांनी उपहासात्मक टीका केली.