पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : १३ मार्चला अंदमान-निकोबारला गेलो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं होतं त्या दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हाच माझा सहकारी धावत आला आणि म्हणाला, ‘भाऊ, तुमचे तिकीट घोषीत झाले’. योगायोग कसा असतो हे मी अनुभवतो आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीरांचे दर्शन आणि दुसरीकडे देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आदेश होता, असा भावनिक प्रसंग ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रथम चंद्रपूर आगमनानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. गांधी चौकात झालेल्या सभेत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘१३ मार्चला पक्षाने मला अंदमान-निकोबारला पक्षाचा लोकसभा प्रभारी म्हणून दोन दिवसांच्या प्रवासासाठी पाठवले. ११ तारखेला देशनायक श्री. नरेंद्रजी मोदी आणि अमितभाईंनी मला ‘लोकसभा लढनी होगी’ असा आदेश दिला. मनामध्ये द्वंद्व होते. ३० वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी जेव्हा माझ्याकडे यायचा, मी पूर्ण शक्तीने मदत करायचो. मी कधी जात, धर्म, वंश आणि पक्षाचाही भेद केला नाही. काँग्रेसच्या नेत्याने माझ्यावर टिकाही केली असेल, पण संकट आले तेव्हा त्याचीही मदत केली. ‘अगर कोई हमदर्द समझकर मेरे कार्यालय में आता है, तो मैं जीवन में कभी उसे सिर दर्द नहीं समझूंगा, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
‘ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, शहिदे आझम भगतसिंगांनी या देशाच्या स्वातंत्र्याचा झेंडा देशाच्या जनतेच्या हातात दिला. आता चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेचा आवाज त्या नवीन संसद भवनामध्ये बुलंद करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
‘आज शब्द जड झालेत’
मी अनेक वर्षांपासून भाषण देतोय. चंद्रपूरच्या गांधी चौकापासून मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत आणि पुढे दिल्लीतील संसद भवनात झालेल्या शिबिरातही भाषण केले आहे. पण आज मात्र माझे शब्द जड होत आहेत. कारण निवडणुक जिंकण्यापूर्वीच एवढे जल्लोषात स्वागत होत आहे, अशा भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. दुपारी बारा वाजता नागपूर विमानतळावर पोहोचलो आणि नागपूर ते चंद्रपूर अवघे दोन तासांचे अंतर पूर्ण करायला मला ९ तास लागले. जनतेचे, कार्यकर्त्यांचे प्रेम बघून भारावलो आहे, या शब्दांत व्यक्त होतानाच हिंदू, मुस्लीम, शिख, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे प्रतिनिधी व्यासपीठावर आलेले बघून आयुष्यातील खरा आनंद अनुभवतोय, असेही ते म्हणाले.