तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची लाभार्थ्यांना लवकरच अर्थसहाय्य देण्याची घोषणा
पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : राज्य सरकार शेतकऱ्यांना अत्याधुनिक साहित्यांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. परंतु जिल्ह्यातील तसेच राज्यात हजारो शेतकरी शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याची बाब आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्याला उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित अनुदान देण्याची घोषणा सभागृहात केली. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
राज्यात शेतकऱ्यांना शासनासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यात शेतकरी समृद्ध व्हावा हा त्यांचा उद्देश आहे. परंतु एकीकडे राज्यातला शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करीत आहे. दुसरीकडे शासन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या बाबतीत उदासीन आहे, असे चित्र पाहावयास मिळत आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मे, २०२३ अखेरीस राज्यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत १८ हजार ८९५, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ८ हजार ४०७ व राकृवियो अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प अंतगर्त १ हजर ८३६ लाभार्थी अनुदानासाठी प्रलंबित आहे. याला लागणार निधी २०९ कोटी असून या अर्थसंकल्पात ३०० कोटीची तरतूद करण्यात आली असून. या आर्थिक वर्षी सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितले. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत ३८३, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील १८१ व राकृवियो अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प अंतगर्त ९९ लाभार्थी अनुदानासाठी प्रलंबित होते. सदर लाभार्थ्यापैकी कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील १२१ लाभार्थ्यांचे, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ६४ तर राकृवियो अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प अंतर्गत ३८ लाभार्थ्यांचे अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे इतर शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब छापील उत्तरात सरकारने दिली. परंतु तोंडी उत्तरात मंत्री महोदयांनी चंद्रपूर सह राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ त्वरित देण्याची घोषणा केली आहे.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सरकारला धारेवर धरत शेतकरी बांधवांचे प्रश्न विधानसभेत लावून धरले आहे. या माध्यमातून शेकडो लाभार्थ्याना लाभ देण्यात येत असून शेतकरी बांधवांकडून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानण्यात येत आहे.