लढा आरक्षणाचा – पुढच्या पिढीच्या हक्कासाठीचा
(साभार योगेश केदार यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून)
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी असताना समोर येणारे जीवनाच्या विविध पळून पैकी एका पैलूच दर्शन योगेश केदार यांनी आपल्या पोस्टवरून करून दिले आहे. हा आरक्षणाचा लढा खरोखर पुढील पिढीच्या हक्कासाठी चा लढा बनला असल्याची प्रचिती या फोटोवरून आणि या पोस्टवरून मिळत आहे.
“मला सीमेवर असलेल्या सैनिकांच्या भावना काय असतात? त्याग म्हणजे काय असतो? याची जाणीव होत आहे. आठ महिन्यांची गरोदर असलेली बायको पुण्यात एकटीच राहत आहे. आज घडीला माझी तिला अत्यंत गरज असताना मी मात्र गोणपाटाचे वस्त्र परिधान करून मराठा वनवास यात्रेत फिरतोय.
काल बायको दवाखान्यात गेली होती. तिने गर्भात असलेल्या आमच्या बाळाचा थ्रीडी फोटो पाठवला. माझा आणि बाळाचा कोलाज करून पाठविलेला फोटो पाहिला अन् माझ्या मनात कालवाकालव झाली. अजुन चार आठवड्यांनी बाळाचा जन्म होईल. एक मन म्हणत होतं की तिच्याकडं जाऊन यावं. दुसरं मन जबाबदारीची जाणीव करून देत आहे.
आम्ही मात्र तुळजापूर मधून निघत मुंबईच्या दिशेने पायवाट तुडवत गावोगाव सभा घेत मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण हा मुद्दा समजाऊन सांगत आहोत. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण शिवाय दुसरे कोणतेच आरक्षण फायद्याचे नाही. 23 मार्च 1994 रोजी आमच्या हक्काचे हिरावले गेलेले आरक्षण पुन्हा परत मिळवण्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर सुरू असलेला आरक्षणाचा वनवास मिटवण्यासाठी ही मराठा वनवास यात्रा आहे”.