पो. डा. वार्ताहर, मुंबई : – राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नाही तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले होते.
यामध्ये डॉ. अमोल कोल्हे आणि सुनील तटकरे यांचा सहभाग होता. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पहिला धक्का बसला आहे. कारण त्यांच्या सोबत गेलेल्या अमोल कोल्हेंनी त्यांची साथ सोडली असून, ते शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे.
त्यासाठी अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत.’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांच्या घर वापसीनंतर विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंचा हाच व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना, “पहिला मोहरा परत..! असे म्हटलं आहे.