मुंबई – राज्यात वर्षभरापूर्वी शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे. यावेळी राजकारणातील चाणक्य समजले जाणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच ही घडामोड घडल्याने राज्यासह देशाचे याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त केल्याचे सांगितले, तर सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असल्याची माहितीही दिली.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, मला पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. या नात्याने मी काही नियुक्त्या केल्या होत्या. तसे अधिकार मला देण्यात आले होते. त्यानुसार मी नियुक्त्या केल्या आहेत. तीन वर्षांत कार्यकारिणी बदल होणे आवश्यक होते. पण निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम होते. आता मी त्यांना कार्यमुक्त करत आहे. त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर, तर अमोल मिटकरी यांची पक्षाचे प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या व्यतिरिक्त गटनेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.तसेच, विरोधी पक्षनेता निवडण्याचे काम विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. अपात्रतेची नोटीस देणे हे बेकायदेशीर आहे. आता महायुतीचे सरकार असून ते चांगले काम करेल. विधानसभा अध्यक्षांकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर आम्ही रविवारीच अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र दिले असल्याचे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष
आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचे सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतला. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही गटांची बुधवारी बैठक
येत्या 5 जुलै शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे याच पक्षातील दुसऱ्या गटाकडून म्हणजेच अजित पवार यांच्या गटाने पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे खरी शिवसेना कोणती? असा प्रश्न वर्षभरापूर्वी निर्माण झाला होता, तोच प्रश्न आता राष्ट्रवादीबाबत देखील निर्माण झाला आहे. या बैठकीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार असल्याचे समजणार आहे.