पो. डा. जळगाव,
पाचोरा तालुक्यातील नागरिक जन्म, मृत्यू नोंद, सातबारा, खाते उतारा, फेरफार नोंदी तसेच नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड विभक्त करणे रेशनकार्ड मधील नावे कमी करणे, नवीन नावे समाविष्ट करणे तसेच बारकोड म्हणजे बारा अंकी नंबर मिळवून घेण्यासाठी पाचोरा तहसील कार्यालयात येत असतात.
आमची साहेबांशी ओळख आहे, आम्ही तुमचे काम करून देतो असे सांगत संबंधितांकडून नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी दोन हजार, रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी एक हजार, बारकोड मिळवण्यासाठी पाचशे रुपये तसेच जन्म, मृत्यू दाखले, खाते उतारा, फेरफार नोंदी काढून देण्यासाठी गरजुंची परिस्थिती व मानसिकता पाहून पाचशे रुपयांपासून तर पाच हजार रुपयांपर्यंत पैसे उकळत असल्याचे त्रस्त नागरिकांची तक्रार आहे
याबाबत अधिक तपास केल्यावर तहसील कार्यालयाजवळील काही व्यवसायिक व काही सुज्ञ लोकांकडून याबाबत माहिती जाणून घेतली असता पाचोरा तालुक्यातील काही तरुण याठिकाणी चांगल्या वेशभूषेत येऊन थांबतात व याठिकाणी हातात कागद घेऊन फिरणाऱ्यांना तसेच झेरॉक्स दुकानांच्या आसपास उभे राहून कोण, कोण, कश्यासाठी व कोणत्या कामासाठी झेरॉक्स काढत आहेत याबद्दल माहिती मिळवून संबंधितांशी संवाद साधून आपल्या शैलीत संधान साधून तुमचे काम आम्ही करुन देतो असे सांगून वरीलप्रमाणे कामानुसार तसेच गरजेनुसार पैसे घेऊन लुट करत असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
पुरवठा विभागाचे कार्यालयात चौकशी केली असता आमच्या कार्यालयाचे बाहेर कोण, काय करतो किंवा करत असेल याबाबत आम्हाला माहिती नाही. ज्यांना पुरवठा विभाग किंवा तहसील कार्यालयातून दाखले, कागदपत्रे मिळवण्यासाठी काही अडचणी येत असल्यास संबंधित विभागाचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
बारा अंकी नंबरसाठी सगळ्यात जास्त पैसे मोजावे लागतात कारण बारा अंकी नंबर असल्याशिवाय धान्य दुकानदार धान्य देत नाहीत.
नागरिक जेव्हा तहसील कार्यालयात कागदपत्रे घेऊन जातात तेव्हा या टेबलवरुन त्या टेबलावर फिरवा फिरव झाल्याने त्रस्त होतात.
नवीन रेशनकार्ड बनवणे, रेशनकार्ड विभक्त करणे, नाव वाढवणे, नाव कमी करणे, कामी सहकार्य मिळत नसल्याने या कार्यालयात दोन, दोन महिने चक्करा घालून सुद्धा काम होत नाही. तर कागदपत्रे दलाला जवळ दिल्यानंतर तेच काम काही तासांत किंवा काही दिवसातच मिळते, यामुळे नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत शंका निर्माण होते आहे.