आपल्या पशुधनाला ‘कर्ण बिल्ले’ लावून घ्या; पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर,:- पशुपालकांनो आपल्या पशुधनाला कर्ण बिल्ले (इअर टॅगिंग) लावले का? लावले नसल्यास लावून घ्या. आपल्या जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यात त्यासाठी संपर्क साधा. कारण येत्या १ जून पासून असे कर्ण बिल्ले नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
जनावरांच्या कानात पशुसंवर्धन विभागाने दिलेले बिल्ले असल्याशिवाय आता यापुढे जनावरांची खरेदीविक्री करता येणार नाही,तसे होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यास प्रतिबंधित करावे,असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
‘इअर टॅगिंग’ पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नॅशनल डिजीटल लाईव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये पशुपालकांकडील सर्व पशुधनास इअर टॅगिंग (कानातील पिवळा बिल्ला) केल्यानंतर सर्व नोंदी ऑनलाईन करुन घेण्यास मदत होणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यक हे पशुपालकाच्या गोठ्यात जाऊन जनावरांना ‘इअर टॅगिंग’ च्या नोंदी करुन घेणार आहेत.
जनावरांच्या सर्व नोंदींचे डिजीटलायझेशन
जनावराच्या जन्म-मृत्यु नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. या प्रणालीवर जिल्ह्यातील सर्व पशुधनाची प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म मृत्यु इ. सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पशुधनास कानास टॅग लावुन भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी केले आहे.
संसर्गजन्य रोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी उपयुक्त
प्राण्यांमधील संकमण व सांसर्गिक रोंग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी जेणे करुन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यास मदत होईल. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व पशुधनाचे इअर टॅगींग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्याबाबत सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व अन्य सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
इअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार, गावागावातील खरेदी विक्री, बैलगाडा शर्यती इ.करण्यास दि.१ जून २०२४ पासून प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच जनावरांची जन्म, मृत्यू तसेच विक्रीबाबतच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक केले आहे.
काय आहे इअर टॅगिंग?
इअर टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानात पिवळ्या रंगाचा एक प्लॉस्टिक बिल्ला (टॅग) लावला जातो. त्यात त्या जनावरांची ओळख दर्शविणारा १२ अंकी क्रमांक असतो. या क्रमांकाच्या आधारे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी त्या जनावरांवर केलेल्या उपचार, लसीकरणाबाबत विविध नोंदी ऑनलाईन घेत असतात. या नोंदी भारत पशुधन पोर्टलवर अपलोड होत असतात. यापुढे पशुपालकांनी जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे, विविध आजार, साथीच्या रोगापासून संरक्षण देणे, चोरी तस्करी पासून संरक्षण करणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालणे अशा विविध बाबींसाठी या टॅगींगमुळे फायदा होईल.