पो. डा. प्रतिनिधी, अहिल्यानगर
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील तरुण उद्योजकाने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. शरद संभाजी लगड, असे मयत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : कोळगाव येथील गाडया खरेदी-विक्री व्यवसायातील तरुण उद्योजक शरद संभाजी लगड यांनी मंगळवारी रात्री जेवण करून सर्व जण झोपी गेल्यानंतर घरातील छताला लावलेल्या फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठलेल्या मयत तरुणाच्या लहान मुलाने आरडा ओरडा केल्यानंतर लक्षात आली.
घटनेची माहिती बेलवंडी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरुण उद्योजकाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.