काळम्मावाडी प्रकल्पात 40 कोटींचा घोटाळा : कार्यकारी अभियंता निलंबित, फडणवीस यांची घोषणा
पोलीस डायरी वार्ताहर, कोल्हापूर : काळम्मावाडी जलसिंचन प्रकल्पाच्या डावा कालव्याच्या कामात 40 कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंता विनया बदामे यांना निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्याचवेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूकही केली. या प्रकरणाचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत या घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या प्रकल्पात आधी काही कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आल्यावर दक्षता पथकाने कारवाई केली. त्यात 3 कोटी 88 लाख रुपयांच्या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती, तरीदेखील पुन्हा कंत्राटदाराला तांत्रिक समितीची मान्यता न घेताच 40 कोटी रुपये देण्यात आले, असे आबिटकर यांनी सांगितले.
कार्यकारी अभियंता आणि अधिकारी जनतेच्या द़ृष्टीने मूलभूत कामासाठी पैसे देत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही टाळाटाळ करतात. मात्र, ठेकेदारांना संगनमताने कसे पैसे देतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला
या लक्षवेधीला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काळम्मावाडी प्रकल्पाचा डावा कालवा 76 कि.मी.चा आहे. यातील 32 ते 76 कि.मी. कालव्याच्या कामात कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी दक्षता पथक, पुणे यांचा प्राथमिक अहवाल 7 ऑगस्ट 2020 मध्ये सरकारला प्राप्त झाला. यामध्ये अनियमितता आणि अधिकचा निधी दिल्याचे सिद्ध झाले आहे. कंत्राटदाराने काम सुरू करण्यापूर्वीच त्याचे प्रलंबित 40 कोटींचे बिल कार्यकारी अभियंत्याने दिले. त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता यांचे तातडीने निलंबन करण्यात येत असल्याचेहि त्यांनी घोषित केले.