पो. डा. जिग्नेश जेठवा, क्राईम रिपोर्टर, नाशिक: हरियाणा सोनिपथ येथून कोपरगाव येथे कुरियरने पाठविण्यात आलेल्या सहा तलवारींचे पार्सल अंबड पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील गरवारे पॉईंट येथील एका कुरियरच्या कार्यालयात केली. याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. अंबड पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हरियाणा सोनीपथ येथून कोपरगाव येथे सहा तलवारींचे पार्सल येणार असून हे पार्सल प्रथम नाशिक अंबड एमआयडीसी वसाहत परिसरातील गरवारे पॉईंट येथील एका कुरियरच्या कार्यालयात येणार आहे. तेथून ते पार्सल कोपरगाव येथे जाणार असल्याचा गुप्त संदेश अंबड पोलिसांना मिळाला. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुगले, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस नाईक समाधान चव्हाण, दिनेश नेहे, जनार्दन ढाकणे आदींनी कुरियर कार्यालयाला जावून चौकशी केली. यावेळी सोनीपथ येथून आलेले पार्सल उघडुन पाहिले असता त्यात सहा तलवारी आढळून आल्या. यानंतर पोलिसानी या सहा तलवारी जप्त केल्या .
पार्सल नाशिकमधून कोपरगाव येथे जाणार होते. याप्रकरणी अंबड पोलिसांनी कोपरगाव येथील संशयित सचिन मोरे व हरियाणा सोनीपथ येथील तलवारी पाठविणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुगले, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत. तसेच अंबड पोलिसांचे पथक लवकरच कोपरगाव येथे जाऊन संशयित मोरे याला ताब्यात घेणार असून या तलवारी का मागविल्या आहेत, याची माहिती घेणार असल्याचे तपास अधिकारी यांनी सांगितले.