पोलीस डायरी न्यूज जळगांव :
भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात ऊर्फ हंप्या यांच्या हत्याकांडात अटकेत असलेल्या पाच संशयितांपैकी एकाची बुधवारी (ता. १०) सकाळी सातच्या सुमारास जळगाव जिल्हा कारागृहात हत्या करण्यात आली. मृतासह इतर चौघेही शेखर मोघे याला सारखे त्रास देत होते. या त्रासामुळे संयम संपलेल्या मोघे याने एकाची गळा कापून हत्या केल्याची कबुली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दिली आहे. पोलिसांनी मारेकऱ्यास ताब्यात घेतले असून, हल्ला करण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे २०१९ मध्ये पूर्ववैमनस्यातून भाजपचे नगसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या, त्यांचे थोरले बंधू सुनील खरात, मुलगा सागर आणि रोहित उर्फ सोनू, मुलाचा मित्र सुमित गजरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. रवींद्र यांची पत्नी रजनी, तिसरा मुलगा हितेश यांच्यासह चौघे जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी राज ऊर्फ मोहसीन अजगर खान, मयुरेश सुरवाडे, शेखर हिरालाल मोघे, आकाश सुखदेव सोनवणे, गोलू ऊर्फ अरबाज खान या पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. भुसावळच्या गुन्हेगारीत माजी नगरसेवक रवींद्र खरात मोठे नाव होते. या हत्याकांडानंतर भुसावळ शहरात नव्याने नावारूपाला येऊ पाहत असलेल्या टोळीची क्रेज वाढत होती. अटकेतील पाचही जण भुसावळवर लक्ष ठेवून होते. मोघेच्या भावाने सट्टा, पत्त्याचा क्लब टाकला, तर इतरांचे भाऊबंद व नातेवाइकांनीही भुसावळात अवैध धंदे सुरू केले. ज्यांचे धंदे नाहीत, अशांचाही दबदबा भुसावळ शहरात होताच. त्यात मोहसीन व त्याच्या भावाचा दबदबा वाढत होता. जेलमध्ये राहून प्रत्येक जण आपआपल्या परीने भुसावळात बस्तान मांडू पाहत होते. अटकेत असलेल्या पाच जणांपैकी शेखर मोघे खरात हत्याकांडात माफीचा साक्षीदार होतो की काय, अशी भीती उर्वरित चौघांना होती. त्यामुळे ते मोघे याचा वेळोवेळी अपमान करून त्रास द्यायचे. या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोघे चार दिवसांपासून पाळत ठेवून होता. कारागृहात सहा विभक्त कोठड्यांपैकी तीन नंबर बॅरेकमध्ये शेखर हिरालाल मोघे, आकाश सोनवणे, नीलेश चंद्रकांत होते. चार नंबर बॅरेकमध्ये अरबाज खान, मोहसीन खान व त्यांच्यासोबत मयुरेश सुरवाडे होते. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास जिल्हा कारागृहात बंदिवानांना बाहेर सोडण्यात आले. काही अंघोळीला, काही शौचास, तर काही बॅरेकमध्येच झोपून होते. मोहसीन व मयुरेश सुरवाडे बॅरेकमध्ये झोपून होते. मोहसीनचा भाऊ अरबाज बाहेर गेला होता. हीच संधी साधत चार नंबर बॅरेकमधून शेखर मोघे याने बॅरेक तीनमध्ये जाऊन मोहसीनच्या अंगावर बसत त्याचा गळा चिरला व छातीत चाकू खुपसला. मोहसीनच्या विव्हळण्याच्या आवाजाने मयुरेश उठला व त्याने आरडाओरड केल्यावर कर्मचारी धावत आले. नंतर जखमी मोहसीनला रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मोघे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने खुनाची कबुली दिली. अशी घडली घटना जिल्हा कारागृहात बुधवारी (ता. १०) नेहमीप्रमाणे कामकाजाला सुरवात होऊन सकाळी बंदिवान बॅरेकमधून मोकळे करण्यात आले. काही बंदिवान नेहमीप्रमाणे सकाळची आवश्यक कामे आटोपत होते. त्यात काही अंघोळ करत होते, काही कपडे धुवत होते. अशातच बॅरेक क्रमांक चारमधून मयूरेश सुरवाडेच्या आरडाओरडचा आवाज आल्याने काही बंदिवानासह काराहगृह रक्षकांनी धाव घेतली. बॅरेकमध्ये मोहसीन असगर खान रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता. त्याच्याजवळ हातात चाकू घेऊन शेखर मोघे आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे