जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या
खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागास सूचना
पो.डा. वार्ताहर, वाशिम :
जिल्हयात खरीप हंगामात विविध पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांना या खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते योग्यवेळी उपलब्ध करुन देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षताघ्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले.
खरीप हंगाम २०२४ पुर्वतयारी आढावा बैठक २९ एप्रिल रोजी वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. सभेकरीता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांच्यासह जिल्हयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख व कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.
सभेमध्ये माहितीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांनी केले. खरीप हंगाम २०२४ ची पुर्वतयारी म्हणुन ४ लाख ५ हजार १८० हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले असुन यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ३ लाख ७ हजार २७५ हेक्टर, तुर ६१ हजार हेक्टर, कपाशी ३० हजार ८२० हेक्टर, खरीप ज्वारी ६०० हेक्टर, मुग २ हजार १०० हेक्टर, उडिद २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याकरीता लागणा-या बियाण्याची मागणी नोंदविण्यात आले प्रमाणात उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे.
सोयाबीन या प्रमुख पिकाकरीता जिल्हयाचे बियाणे बदलाचे प्रमाण एकुण 29 टक्के असुन त्याकरीता 66 हजार 832 क्विंटलची बियाणे मागणी नोंदविण्यात आली आहे. व उर्वरीत लागणारे बियाणे शेतक-याकडे घरगुती पध्दतीने जतन करण्यात आलेले आहे. कापुस बी टी बियाण्याची 1 लाख 54 हजार 100 पाकिटाची मागणी नोंदविण्यात आली असुन मे अखेरपर्यंत उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत सर्व पिकाचे बियाण्याची उपलब्धता होईल व कुठलीही टंचाई भासणार नाही असे बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामाकरीता रासायनिक खताची 75 हजार 60 मे. टन खताची मागणी करणयत आली असुन 72 हजार 300 मे. टनाचे आवंटन कृषि आयुक्तालयाकडुन मंजुर करण्यात आले असुन खताचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध होईल. त्याप्रमाणे नॅनो युरीया 18 हजार 500 बॉटल्स व नॅनो डिएपी 5 हजार बॉटल्सचे आवंटन मंजुर असुन शेतक-यांनी नॅनो युरीया व डिएपीचा वापर करण्याबाबत प्रसार व प्रचार करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
रासायनिक खताचा खरीप 2024 करीता डीएपी 590 मे.टन, युरीया 900 मे.टन बफर स्टॉक करण्याचे नियोजन असुन आज अखेर डीएपी 175 मे टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. पेरणीपुर्व घरगुती बियाण्याची उगवणक्षमता तपासणी व बिजप्रक्रिया सयंत्राद्वारे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे प्रचार प्रसार करुन मोठया प्रमाणात बिजप्रक्रिया करुनच पिकाची पेरणी करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाची बीबीएफ यंत्राद्वारे किंवा सरी वरंबा पध्दतीने लागवड करण्याबाबतचे जनजागृती करुन मोठया प्रमाणावर पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शाह यांनी सभेदरम्यान दिली.