हिवतापः नियंत्रण व उपाययोजना
दि.२५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन आहे. त्यानिमित्त हिवताप या आजाराची शास्त्रीय माहिती व उपाययोजनांविषयी जाणून घेण्यासाठी विशेष लेख.
जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक हिवताप दिनानिमित्त या वर्षाचे घोषवाक्य “ Accelerating the fight against malaria for a more equitable world” अर्थात “मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतीमान करु या लढा मलेरियाला हरविण्यासाठी ” असे ठरविले आहे.
हिवताप हा आजार ‘प्लासमोडीयम’ या परोपजीवी जंतूंपासुन होतो. हे जंतू ‘ॲनाफिलस’मादी डासाच्याद्वारे प्रसारित होतात. महाराष्ट्रामध्ये हिवतापाच्या जंतूंचे व्हायव्हॅक्स व फॅलसीफेरम हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.
मलेरियाच्या जंतूंचा अधिशयन काळ :- १०ते १२ दिवसांचा आहे.
हिवतापाची लक्षणे :-
१. थंडी वाजुन ताप येणे
२. ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो.
३. नंतर घाम येऊन अंग गार पडते.
४. ताप आल्यानंतर डोके अतिशय दुखते.
५. बऱ्याचवेळा उलट्याही होतात.
रोग निदान:- प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करुन हिवतापाचे खात्रीशीर निदान करता येते. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात.
औषधोपचार:- रक्तनमुना तपासणीच्या अंती हिवतापाच्या प्रकारानुसार वयोगटाप्रमाणे औषधोपचार दिला जातो. यामध्ये पी.व्ही. रुग्णास क्लोरोक्वीन तीन दिवस व प्रायमाक्वीन गोळ्यांचा औषधोपचार १४ दिवस देण्यात येतो. पी.एफ. रुग्णांस अे.सी.टी.गोळ्या (आर्टिसुनेट कॉम्बीनेशन थेरपी) तीन दिवस व दुसऱ्या दिवशी प्रायमाक्वीन गोळ्याची मात्रा वयोगटाप्रमाणे देण्यात येते.
दक्षता :-
१) ही औषधी उपाशी पोटी देण्यात येऊ नये.
२) गर्भवती माता, एक वर्षाखालील बालक आणि जी.सिक्स, पी.डी.ची कमतरता असणाऱ्या या रुग्णांना प्रायमाक्विन देऊ नये.
३) औषधोपचार आरोग्य यंत्रणेच्या देखरेखी खाली देणे.
प्रतिबंधात्मक उपाय योजना :-
१. सर्व्हेक्षण:- प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्व्हेक्षण अंतर्गत रक्त नमुने घेऊन रुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार करण्यात येतो.
२. डास अळी व डास नियंत्रण:- डास अळी नियंत्रण ही सर्वात महत्वाची कृती आहे. हिवताप, डेंग्यु व चिकुनगुनियाचे डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात.
३. डासोत्पती स्थाने:- पावसाळ्यात साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कुलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या, इत्यादी.
४. कोरडा दिवसः- डासोत्पती स्थाने नष्ट करण्यासाठी आठवड्यातून एकदा पाणी साठे रिकामे करुन कोरडा दिवस पाळण्यात यावा.
५. डबके नष्ट करणेः- साचलेली डबके व नाल्या वाहत्या कराव्यात. खड्डे बुजविण्यात यावेत. शक्य नसल्यास या पाण्यावर आठवड्यातून एकदा रॉकेल, टाकाऊ ऑईल टाकण्यात यावे.
६. ॲबेटींगः- आरोग्य विभागामार्फत घरातील सांड पाण्याचे रिकामे न करता येणाऱ्या पाणीसाठ्यात योग्य प्रमाणात ॲबेटींग केले जाते.
७. सेफ्टी टँकच्या गॅस पाईपला वरच्या टोकाला जाळी बसवण्यात यावी.
८. गप्पी मासेः- डासोत्पती स्थानात गप्पीमासे सोडण्यात येतात.हे मासे डासांच्या अळ्या खातात. सर्व आरोग्य संस्थेत गप्पी मासे मोफत मिळतात.
९. किटकनाशक फरवारणीः- संवेदनशील भागात डास नियंत्रणासाठी किटकनाशकाची फवारणी पावसाळ्यात दोनदा केली जाते. याचा प्रभाव अडीच महिने राहतो. या विभागातील लोकांना १०० टक्के घरे फवारणी करुन घ्यावीत. फवारणी केल्यानंतर तीन महिने घर सारवू नये.
१०. धूरळणीः- उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते. आठवड्याच्या अंतराने दोनदा केली जाते.
मेंदुचा हिवताप (सेरेब्रल मलेरिया)
प्लासमोडीम फॅल्सीफेरमच्या हिवताप रुग्णांस वेळेवर औषधोपचार न मिळाल्यास किंवा उपचार अपूर्ण मिळाल्यास मेंदुच्या हिवतापाचा प्रादूर्भाव होऊ शकतो.
लक्षणे :- तीव्र ताप, तीव्र डोके दुखी व उलट्या होणे, मान ताठ होणे, झटके येणे व रुग्ण बेशुद्ध होणे. याप्रमाणे लक्षणे आढळल्यास त्वरीत नजिकच्या रुग्णालयात दाखल करावे.
आरोग्य संदेश :-
१. घरातील पाणीसाठे आठवड्यात एकदा रिकामे करुन घासून पुसून कोरडे करुन घ्यावे.
२. डासांपासून स्वत:चे रक्षण करण्यात यावे.
३. डास प्रतिबंधात्मक कॉईल, वड्या, क्रिम, मच्छरदाणी, संपूर्ण अंगावर कपडे घालणे इ. उपाय करावे.
४. आपला परिसर स्वच्छ ठेवा.
५. आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
साभार : विशेष लेखः-
लेखक : डॉ. आर.बी.ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी, छत्रपती संभाजीनगर