मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार रद्द
पोलीस डायरी, वार्ताहर बुलडाणा, : लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मलकापूर आणि नांदुरा तालुका वगळता असणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे.
निवडणूक कालावधीतील आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजार व जत्रा अधिनियम 1862च्या कलम 5 नुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही यादृष्टीकोनातून मलकापूर आणि नांदुरा तालुका वगळता शुक्रवारी भरणारे बाजार रद्द करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे