कर्मचारी, नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे – स्वप्निल खटी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
पोलीस डायरी, न्यूज रिपोर्टर, बुलडाणा,: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी न्यायपालिकेंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. तसेच आपले कुटुंबीय आणि आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी केले.
भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘सुनियोजित मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ या प्रमुख कार्यक्रमांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमधून मतदार जागरूकता मंचाची स्थापन करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकामध्ये शासकीय आणि निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता आणि सहकार्यता निर्माण करण्यासाठी हा फोरम महत्वपूर्ण आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 22 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचवेळी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश राजेंद्र मेहरे, संजय डिगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन, तसेच दूरचित्रवाणी परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावरील सर्व न्यायालयाचे न्यायधीश, कर्मचारी आणि विधिज्ञ उपस्थित होते.
सुरुवातीला सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या माझे मत, माझा आवाज या नागरिकांना करण्यात आलेल्या मतदानविषयक आवाहन संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन यांनीही मतदान करण्याबाबत सर्वांनी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश संजय डिगे यांनी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली. जिल्हा प्रणाली प्रशासक प्रदिप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.