मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी संस्थांना प्रशासनाचे आवाहन
पोलीस डायरी न्यूज रिपोर्टर, बुलडाणा, : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती आणि सेवा मिळणार आहे. ॲप सहजपणे डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोडही देण्यात आला आहे.
व्होटर हेल्पलाईन ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या या ॲपने मतदारांशी संबंधित सेवा देऊन क्रांती घडवून आणली आहे. या ॲपमध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांसाठी सेवा, ई-इपिक डाऊनलोड, निवडणूक विषयक माहिती, उमेदवारांची माहिती, निवडणूक निकाल, माहिती स्त्रोत, नवीन घडामोडी, तक्रारी आणि सूचना यासह मतदारयादीतील तपशिलांची दुरुस्ती, मतदारयादीतील नावाचा शोध आणि इतर निवडणूक संबंधित सेवांनी या ॲपने ईसीआयला नागरिकांशी जोडले आहे. तसेच ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम बनविली आहे.
मतदारांना मतदान करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे बुलढाणा मतदारसंघातील 17 लाख 82 हजार मतदारांना व्होटर स्लीपचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे मतदान करण्याबाबतचे आवाहनपर संदेशपत्रक वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
मतदान केंद्रावर मतदारांना किमान सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीत मतदारांसाठी बैठक, पाणी, पंखे आदीची सोय करण्यात येणार आहे. मतदार याठिकाणी थांबून क्रमाने मतदान करण्यास जाऊ शकतील. दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपद्वारे सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना ॲपवरून मतदान केंद्रावरील सोयीसुविधांसाठी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच दिव्यांग आणि 85 वर्षावरील नागरिकांना घरून मतदान करण्याची सोय दिली आहे. यात आजपर्यंत 2 हजार 650 मतदार म्हणजेच 93 टक्के मतदान झाले आहे.
उष्णाघाताच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे. त्यांच्याकडे औषधे आणि ओआरएसचा पुरेसा साठा उपलब्ध राहणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी गृहनिर्माण सोसायटीं, मेडीकल असोशिएशन यांना आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच मतदानासाठी कर्तव्यावर असणाऱ्यांना प्रमापणपत्र देण्यात आले आहे. यामध्ये 11 हजाराहून अधिक मतदान होणार आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 100 टक्के मदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
गेल्या लोकसभेत राज्याचे 61.02 टक्के, तर जिल्ह्यात 63.54 टक्के मतदान झाले आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती केली असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. गेल्या लोकसभेत बुलडाणा विधानसभा क्षेत्रात 55.39 टक्के मतदान झाले होते. यावर्षी या भागत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदानासाठी पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.