पो.डा. वार्ताहर संभाजीनगर :- भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार संभाव्य उमेदवारांना निवडणूकीच्या खर्चासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडणे बंधनकारक आहे. अशा वेळी बॅंकांनी खाते सुरु करणे, चेक बुक देणे इ. कामे वेळेत व्हावीत यासाठी आवश्यक सुविधांची सज्जता राखावी,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी बॅंकांसंदर्भात तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सहा. पोलीस आयुक्त धनंजय पाटील, बॅंक ऑफ बडोदाचे विभागीय व्यवस्थापक किशोर बाबू, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक निकुंज गर्ग, महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक मनोहर वाडकर, नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार तसेच जिल्ह्यातील सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या किमान एक दिवस आधी बॅंक खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. त्यासाठी निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे घ्यावयाची आहेत व ती जपून ठेवावयाची आहेत. त्यांना चेकबुकही द्यावयाचे आहे. ही कामे विहित कालमर्यादेत करावयाची असल्याने त्यासाठी सुविधांची सज्जता ठेवा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, बॅंकांचा समाजातील सर्वस्तरातील लोकांशी विविध सेवा देण्याच्या निमित्ताने संबंध येत असतो. त्यामुळे बॅंकांनी आपल्याकडे येणाऱ्या लोकांना आवाहन करुन मतदार जनजागृती करावी. त्यासाठी दर्शनी भागात आवाहन फलक लावणे, दुर्गम, ग्रामिण भागातील बॅंक शाखांमार्फतही हा उपक्रम राबवून तळागाळापर्यंत जनजागृती व्हावी असे आवाहनही त्यांनी केले.