आरोग्य दूतांचे आवाहन, चला जाऊया मतदानाला: निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग दक्ष
पोलीस डायरी न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी कुठलीही आरोग्यविषयक काळजी न करता आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, त्यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या वेळेत आरोग्यदूत मतदान केंद्रावर आरोग्य सेवेसाठी उपलब्ध आहेत, असा संदेश आज आरोग्य प्रशासनाने दिला.
येत्या दि. २६ एप्रिल रोजी लोकसभा मतदारसंघातील १ हजार ९६२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य विभागही पुढे सरसावला असून उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान लक्षात घेता मतदान केंद्रावर कोणतीही आकस्मिक बाब उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभाग पूर्वतयारी करीत आहे.
आज संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूग्णालय, उप रूग्णालय आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मतदारांना ‘गो वोट–चला जाऊया मतदानाला’ या व्यापक मतदार जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या पुढाकाराने आरोग्य प्रशासनातर्फे आज उपक्रम घेण्यात आला.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून सर्व मतदारांनी चिंता न बाळगता आत्मविश्वासाने आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भागवत भुसारी, कार्यकारी अभियंता विशाल पिंपळे, डॉ. सुरेश घोलप, डॉ. जगदीश डुकरे, डॉ. भिलावेकर तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्व मतदान केंद्रावरील किमान पायाभूत सुविधांमध्ये आरोग्य विभागातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच प्रथमोपचार पेटीसह आरोग्यविषयक संदर्भीय सेवा उपलब्ध असणार आहेत.